Dhurandhar Box Office : अभिनेता रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) कमाई थोडी कमी झाली. पण, सोशल मीडियातील चर्चेने शनिवार आणि रविवार या वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ दिसून आली. या धमाकेदार कामगिरीमुळे, चित्रपट रिलीजच्या पहिल्या वीकेंडमध्येच १०० कोटी रुपयांचा आकडा पार करण्याच्या जवळ पोहोचला. या चित्रपटाचा प्रभाव केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर शेअर बाजारातही दिसून आला आहे.
PVR Inox च्या शेअर्सना 'धुरंधर'चा आधार
चित्रपटाच्या दमदार वीकेंड कलेक्शनमुळे सोमवारच्या व्यवहारात पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. शुक्रवारच्या थंड प्रतिसादानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घट झाली होती, पण शनिवार आणि रविवारच्या कमाईच्या आकडेवारीनंतर सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास अडीच टक्क्यांचा (२.४५%) उसळी दिसून आली. बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपनीचा शेअर २.४५ टक्क्यांच्या तेजीसह १,११८ रुपयांपर्यंत पोहोचला. (दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी शेअर १,०९०.९० रुपयांवर व्यवहार करत होता.)
कंपनीच्या व्हॅल्यूएशनमध्ये वाढ
या तेजीमुळे पीव्हीआर आयनॉक्सच्या एकूण मार्केट व्हॅल्यूएशनमध्ये मोठी वाढ झाली. शुक्रवारच्या व्यवहारात कंपनीचे मूल्यांकन १०,७७७.४५ कोटी रुपये होते. सोमवारच्या व्यवहारादरम्यान शेअरने दिवसाचा उच्चांक गाठला तेव्हा कंपनीची व्हॅल्यूएशन १०,९७८.७६ कोटी रुपयांवर पोहोचली. याचा अर्थ, कंपनीच्या व्हॅल्यूएशनमध्ये २०१.३१ कोटी रुपयांचा मोठा फायदा झाला आहे.
'धुरंधर'चा वीकेंड कलेक्शन
आदित्य धर दिग्दर्शित आणि हेरगिरीवर आधारित हा चित्रपट २०२५ मधील सर्वात दमदार चित्रपट ठरत आहे. व्यापार पोर्टल सैकनिल्क आणि तरण आदर्शच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये (तीन दिवसांत) १०६.५० कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारचा पहिला दिवस २८.६० कोटी रुपये, शनिवार दुसरा दिवस ३३.१० कोटी रुपये वाढ तर रविवार तिसऱ्या दिवशी मोठी झेप घेत आकडा ४४.८० कोटींपर्यंत पोहचला.
वाचा - तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे, आगामी काळात चित्रपटाची ऑक्युपन्सी आणखी वाढू शकते. यामुळे चित्रपटाच्या कमाईसोबतच थिएटर कंपन्यांच्या महसुलातही मोठी वाढ अपेक्षित आहे.
